Wednesday, November 18, 2015

डिजिटल रंगरंगोटी आणि जागतिक समस्या


नुकताच पॅरिस हल्ल्याचा निषेध म्हणून फेसबुकनी आपला प्रोफाईल फोटो फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाच्या रंगात ठेवण्याचे आवाहन केले. नेहमीप्रमाणे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जगभरातून हल्ल्याचा निषेध म्हणून आणि फ्रान्सच्या लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी असंख्य फेसबुककरांनी आपले प्रोफाईल फोटो बदलले/ रंगवले. फेसबुकचा जन्मदाता मार्क झुकरबर्ग आणि विविध महत्त्वाच्या व्यक्तींनीसुद्धा आपापले फोटो रंगवले.


दोन महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी साहेब अमेरिकावारीसाठी गेले होते तेव्हा त्यांनी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट दिली आणि तेव्हा झुकरबर्ग आणि मोदींसह सर्वांनी आपले फोटो तिरंग्याच्या रंगात रंगवले होते.


काही महिन्यापूर्वी समलैंगिक संबंधांना पाठिंबा म्हणून फेसबुकने आपला प्रोफाईल फोटो इंद्रधनुष्याचा रंगात रंगवण्याची आवाहन केले आणि त्यासही उत्तम प्रतिसाद लाभला होता.


काय साध्य होतं यामुळे ? माझ्या मते काहीच नाही. असे केल्याने उलट फेसबुकचाच फायदा होतो. त्यांना लोकांची मानसिकता समजण्यास मदत होते आणि स्वतःमध्ये काय बदल करता येतील ते समजते आणि ते ही पैसे खर्च न करता!

आपले फोटो रंगवून मृत व्यक्तींना श्रद्धांजली कशी काय मिळणार ? त्यांचे दुःख कसे काय दूर होणार ?  एका व्यक्तीने केले म्हणून त्याचे अंधानुकरण आवण किती काळ करणार? 

जगभरात सध्या दिवाळीची धूमधाम आहे. बऱ्याच  जणांनी आपले दिवाळी साजरी करतानाचे फोटो अपलोड केले आहेत. अशे फोटो रंगवून आपल्यास झालेले दुःख कसे काय व्यक्त होईल ? यातून फक्त काही घटका मनोरंजन होते बाकी काही नाही. 

फ्रान्सच्या मृत व्यक्तींना श्रद्धांजली म्हणून इतर अनेक गोष्टी करता येतील. स्वतः फेसबुक यात पुढाकार घेऊन कार्य करू शकते. माझ्या मते, सर्वप्रथम फेसबुकने दहशतवादाशी संदर्भ असलेली माहिती, फोटो, व्हिडिओ नष्ट करावेत.कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज माहिती एका वेळी जगभरात पोहोचते. आणि फेसबुक हे एक प्रभावी सोशल मीडिया व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भाषेत सर्व सामान्य नागरिक या बाबतीत काय करू शकतात हे सांगावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती करता येईल.
तसेच डिजिटल भारत म्हणजे काय, यामुळे आपल्या आयुष्यात होणारा बदल काय, त्याचे चांगले परिणाम काय, इत्यादि विषयी माहिती द्यावी, ती सुद्धा सर्व भाषेत. तरच सर्व जण डिजिटल भारत साठी पाठिंबा देतील 

असे उपक्रम नक्कीच करता येतील. माझी फेसबुकला एवढीच विनंती आहे की फोटो रंगवण्याची पद्धत बंद करा. त्यापेक्षा दहशतवाद, अश्लीलता, रोगराई, कुपोषण, एड्स, स्त्री-पुरुष असमानता हे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून कसे दूर होतील याकडे लक्ष द्यावे.

-ओंकार आंबवणे